अमेरिकी उद्योजकांना मोदींची ग्वाही आर्थिक सुधारणांना चालना

भारतात उद्योग सुरू करण्याआधीच उद्भवणाऱ्या अडथळ्यांचा पाढाच अमेरिकी उद्योजकांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर वाचल्यानंतर गुंतवणुकीबाबतची निर्णयप्रक्रिया वेगवान केली जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. आर्थिक सुधारणांच्या झपाटय़ात जग आमच्यासाठी तिष्ठणार नाही, याची मला कल्पना आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
अमेरिकेतील ‘टाइम’ या मातब्बर प्रकाशनगृहाच्या ‘फॉच्र्युन’ या उद्योग जगतात अत्यंत प्रतिष्ठित मासिकाने मोदी आणि अमेरिकी उद्योजकांची भोजनबैठक आयोजित केली होती. त्या वेळी उपस्थित असलेल्या अमेरिकी कंपन्यांच्या ४२ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी बहुतेकांनी भारतात उद्योग आणि गुंतवणुकीत येणाऱ्या अडचणींचा स्पष्ट पाढाच वाचला.
अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे र्निबध, पदोपदी लागणारी विविध प्रकारच्या परवानग्यांची गरज, प्रशासकीय अधिकाऱ्यांची निर्णय संदिग्धता, पायाभूत सुविधांची वानवा आणि स्थानिक करांचा बोजा या गोष्टी भारतात गुंतवणूक करण्याबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण करतात, असे या उद्योजकांनी स्पष्टपणे सांगितले. भारतात आपण ज्या सुधारणा घडवू इच्छिता त्या कृपया अधिक वेगाने अमलात आणा, अशी विनंती या उद्योजकांनी केली. मोदी यांनी भारतात उद्योगानुकूल वातावरण निर्माण केले असले तरी भारत हा आजही उद्योगासाठी सकारात्मक देश नसल्याचे मत एका उद्योजकाने मांडले.
‘फॉच्र्युन’चे संपादक अ‍ॅलन मुरे यांनी या बैठकीला उद्योजकांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादाचेही विश्लेषण केले. जागतिक अर्थकारणात भारताचे स्थान स्थिर होत आहे. चीनची सुरू असलेली आर्थिक घसरण आणि भारतीय विकासदरातील वाढ यामुळे अनेकांना भारतात उद्योग उभारण्याची इच्छा आहे, याकडे मुरे यांनी लक्ष वेधले. मात्र त्याच वेळी भारतात उद्योग आणि गुंतवणुकीत जे अडसर येतात, ते त्यांनी मोदी यांना सांगितले.
आर्थिक सुधारणांनाच माझ्या सरकारचा अग्रक्रम असून सुलभ प्रक्रिया, वेगवान निर्णय, पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावर आमचा भर आहे, असे मोदी यांनी या वेळी सांगितले. जगभर परकीय गुंतवणुकीचे प्रमाण घटले असताना भारतात मात्र त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. भारतीय अर्थव्यवस्थेवरील वाढत्या विश्वासाचेच हे द्योतक आहे, असे ते म्हणाले.
आर्थिक सुधारणा आणि नियंत्रणमुक्तीबाबत भारताने नेमके काय केले आहे आणि कर आकारणीतही सुसूत्रता कशी आणली आहे, याबाबतचे एक पानी तथ्यदर्शक अहवालही या वेळी मोदी यांनी उद्योजकांकडे सुपूर्द केला.उद्योजकांनी ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’ या योजनांचे तसेच स्मार्ट सिटीज मोहिमेचे स्वागत केले, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात भारताने आर्थिक सुधारणांचा वेग वाढवला असल्याची भावना या उद्योजकांनी व्यक्त केली, मात्र हा वेग वाढविण्याचे आवाहन केले.या बैठकीत लॉकहिड मार्टिनचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारीपद सांभाळणाऱ्या मेरिलिन ह्य़ूसन, फोर्डचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी मार्क फिल्ड्स, आयबीएमचे अध्यक्ष गिनी रोमेटी, पेप्सी कंपनीच्या प्रमुख इंद्रा नूयी आणि दाव केमिकलचे अध्यक्ष अ‍ॅण्ड्रय़ू लिवेरिस सहभागी झाले होते.

‘फोर जी’साठी माध्यम प्रमुख आग्रही
अमेरिकेतील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रमुखांचीही पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक झाली. त्यात भारतात ‘फोर जी’ नेटवर्कचा वेगाने विस्तार केला जावा आणि दूरचित्रवाणीच्या डिजिटायझेशनलाही चालना द्यावी, अशी मागणी बहुसंख्य माध्यमप्रमुखांनी केली. न्यूज कॉर्पचे रुपर्ट मरडॉक, सोनी एन्टरटेन्मेन्टचे मायकेल लिन्टन, डिस्कव्हरी कम्युनिकेशन्सचे डेव्हिड झास्लाव्ह यांच्यासह अनेक मातब्बर माध्यमश्रेष्ठी उपस्थित होते. सध्या भारतात परकीय माध्यमांना २६ टक्के गुंतवणुकीची परवानगी आहे. ती मर्यादा व्यापक करण्याबाबत मात्र कोणतीही ग्वाही देण्यात आली नाही, असे परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.