‘एअर इंडिया’च्या वादग्रस्त ड्रीमलायनर विमानांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. लंडन विमानतळावर मंगळवारी उड्डाण घेत असतानाच ‘एआय-११६’ या ड्रीमलायनर विमानाच्या सिग्नल यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्याने तात्काळ या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. मेलबर्नच्या विमानतळावर सोमवारी धावपट्टीवर उतरत असताना एका ड्रीमलायनर विमानाच्या पुढील भागास तडा गेला होता. दुसऱ्याच दिवशी याच प्रकारच्या विमानाला पुन्हा अपघात झाल्याने त्याच्या उपयोगितेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लंडनहून हे विमान १७४ प्रवासी आणि १० कर्मचाऱ्यांना घेऊन दिल्लीला चालले होते. मात्र या विमानातील सिग्नल यंत्रणेने धोक्याचा इशारा दिल्याने विमानाचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षभरात ड्रीमलायनर विमानाचे सात ते आठ अपघात झाले असल्याने त्याच्या उपयोगितेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.