पुरेशी कागदपत्र नसल्याने प्रवेशासाठी शाळांचे हेलपाटे घालणा-या मधू या पाकिस्तानमधून आलेल्या मुलीला अखेर दिलासा मिळाला आहे. दिल्ली सरकारने मधूसाठी नियम शिथील करत तिला शाळेत प्रवेश घेण्याची परवानगी दिली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मधूच्या प्रवेशासाठी पुढाकार घेत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी मधू तिच्या काका, आई आणि अन्य भावंडांसोबत पाकिस्तानमधून भारतात आली होती. पाकिस्तानमधील जातीय दंगलीनंतर त्यांनी भारतात स्थलांतर केले होते. मधूला नववी इयत्तेत प्रवेश हवा होता. मात्र मधूकडे आधारकार्ड आणि अन्य कागदपत्र नव्हती. त्यामुळे दिल्लीतील संजय कॉलनीतील शाळेत तिला प्रवेश मिळत नव्हता. काही दिवसांपू्र्वीच मधूने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी मधूला दोन दिवसांत प्रवेश मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी मधूच्या प्रवेशाचा तिढा सुटला.
सुषमा स्वराज यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. सोमवारी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी मधूची भेट घेतली. मधूच्या शिक्षणाची जबाबदारी दिल्ली सरकारने घेतली आहे. मुलींच्या शिक्षणात बाधा येऊ नये असे त्यांनी सांगितल्याचे मधूने म्हटले आहे. मधू जिथे राहते तिथे अशी समस्या येणा-या मुलांनी पुढे यावे, त्यांनी माझी भेट घ्यावी, त्यांच्या समस्यांवर मी तोडगा काढीन. पण सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
काही कारणास्तव मधूकडे शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला अशी कागदपत्र नाहीत. पण तिला शिक्षण घ्यायचे आहे. आम्ही माणूसकीच्या दृष्टीने तिला प्रवेश देत आहोत असे सिसोदीया यांनी निवेदनात म्हटले आहे. सिसोदीयांच्या या विधानानंतर आता मधूला दिल्लीतल्या कोणत्याही सरकारी शाळेत प्रवेश मिळू शकेल. तिला शाळेचा गणवेश, वह्या- पुस्तकही सरकारकडून दिली जातील अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतातून मधू आणि तिचे कुटुंबीय भारतात आले. तेथील हिंसाचारामुळे त्यांना घर सोडावे लागले होते. घर सोडताना त्यांना सोबत कागदपत्र घेता आली नव्हती. मधूला शाळेत प्रवेश मिळत नसल्याने या संदर्भातील बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रात आली होती. सोशल मीडियावर एका युजरने या बातमीत सुषमा स्वराज यांना टॅग करत मधूची मदत करण्याचे आवाहन केले होते. यानंतर शनिवारी सुषमा स्वराज यांनी शनिवारी मधूला भेट घेण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता मधूला शेवटी शाळेत प्रवेश मिळाला आहे.