सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भारतात झालेल्या हिंसक आंदोलनाच्या मुद्दावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारामध्ये झालेल्या तोडफोडीनंतर इम्रान यांनी हे सीएए आंदोलनावरुन मोदी सरकारला लक्ष्य करणारे टि्वटस केले आहेत.

नानकाना साहिब गुरुद्वारा पाडून तिथे मशीद उभी करु अशी धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी मुस्लिमांविरोधात अत्यंत क्रूरता दाखवली असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

काय आहे इम्रान खान यांच टि्वट?
“भारतीय पोलिसांची क्रूरता अत्यंत खालच्या पातळीला पोहोचली आहे. फॅसिस्ट मोदी सरकारच्या नरसंहाराच्या अजेंडयानुसार मुस्लिमांना भारतात पद्धतशीरपणे संपवले जात आहे” असे इम्रान खान यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

काय घडलं ?

शुक्रवारी पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर जमावाने दगडफेक केली. यावेळी भाविक गुरुद्वारामध्ये होते. मोहम्मद हसन याच्या कुटुंबाने जमावाचे नेतृत्व केले. त्यानेच एका शीख मुलीचे अपहरण करुन तिचे धर्मांतर केले होते.
या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. हसनचा भाऊ एका व्हिडीओमध्ये, यंत्रणेने क्रूरता थांबवली नाही तर, एकाही शिखाला शहरात राहू देणार नाही असे धमकावताना दिसतो. नानकाना साहिब गुरुद्वारापाडून तिथे मशीद उभारण्याची धमकी सुद्धा त्याने दिली.