देशातील बेरोजगारांनी पकोडे विकण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता. यावरून देशात मोठा वाद झाला. तो वाद शमतो न शमतो आता मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याने लोणचं विकण्याचा सल्ला दिला आहे. लोणचं तयार करून विकण्यामुळे रोजगारात मोठी वाढ झाल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

मध्य प्रदेशमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज (गुरूवार) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, पकोडेनंतर लोणचं तयार करून विकणे हा व्यवसायाचा मोठा स्त्रोत असल्याचे सिद्ध झाले आहे. मी माझ्या एका मित्राच्या पत्नीला लोणचं बनवण्याचा सल्ला दिला होता. माझ्या सल्ल्यानुसार त्या महिलेने लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या कंपनीची उलाढाल ही दोन वर्षांत दोन कोटींपर्यंत पोहोचली आहे.

जर एखाद्या व्यक्तीने पकोडे विकून कमाई केली तर तो रोजगार मानणार नाही का, असा सवाल काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आता शेखावत यांनी हे विधान केले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार खरीप पिकांच्या हमीभावात केलेल्या वाढीवर ते बोलत होते. मोदींनी योग्यवेळी शेतकऱ्यांना भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.