देशातील करोना संसर्ग कमी होताना दिसत असला तरीही अद्याप करोनाचा धोका टळलेला नाही. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, देशभरात लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. दरम्यान भाजपाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तर काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

काँग्रेस नेते सिद्धरमय्या आणि दिल्ली उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. सिद्धरमय्या म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना विनामूल्य लसीकरण जाहीर केले आहे.माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार !!”

तसेच मनीष सिसोदिया  म्हणाले,  “आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. न्यायालयाने दखल घेतल्यानंतर देशात मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची इच्छा असती तर त्यांनी फार पूर्वीच हा निर्णय घेतला असता. परंतु केंद्राच्या धोरणांमुळे ना राज्ये लस विकत घेऊ शकली ना केंद्र सरकार दिली.”

लसीकरण धोरणामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले होते. त्यामुळे या नेत्यांनी न्यायालयाने दखल घेतल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.