पोस्टपेड मोबाइल सुविधा मात्र सुरूच

श्रीनगर : काश्मीरमध्ये पोस्ट-पेड भ्रमणध्वनी सेवा सुरू केल्यानंतर काही वेळातच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये ७२ दिवसांनंतर इंटरनेट सुविधेविनाच पोस्ट-पेड भ्रमणध्वनी सेवा सोमवारी सुरू करण्यात आली. मात्र सायंकाळी ५ वाजता एसएमएस सेवा स्थगित करण्यात आली. खबरदारीचे उपाय म्हणून सोमवारी सायंकाळी एसएमएस सेवा बंद करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्याबाबत सविस्तर तपशील देण्यास अधिकाऱ्याने नकार दिला.

पाकिस्तानमधील एका नागरिकासह दोन दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री ८ वाजता शोपियान जिल्ह्य़ात एका ट्रकचालकाची गोळ्या घालून हत्या केली, तर सफरचंदांच्या बागेच्या मालकाला बेदम मारहाण केली. फळांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाल्याचे पाहून आलेल्या नैराश्यातून ही हत्या आणि मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सोमवारी भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यामुळे ग्राहक आनंदित झाले होते, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही कारण सेवा स्थगित करण्यात आल्याच्या कालावधीतील देयकांची थकबाकी असल्याने दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकांची सेवा खंडित केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी दूरसंचार कंपन्यांसमोर देयके भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.

डॉ. अब्दुल्लांची कन्या, बहीण पोलिसांच्या ताब्यात

श्रीनगर : केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्याच्या निषेधार्थ येथे निदर्शने करणाऱ्या सहा महिलांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले त्यामध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांची कन्या आणि बहीण यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. अब्दुल्ला यांची बहीण सुरय्या आणि कन्या साफिया या दोघी महिला कार्यकर्त्यांच्या गटाचे नेतृत्व करीत होत्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हातावर काळ्या फिती लावलेल्या आणि हातात फलक घेतलेल्या महिला निदर्शकांना पोलिसांनी जमू दिले नाही आणि शांततेने तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र निदर्शकांनी पोलिसांची सूचना फेटाळली आणि तेथेच धरणे धरले. तेव्हा महिला सीआरपीएफ कर्मचाऱ्यांनी निदर्शकांना उचलून पोलिसांच्या गाडीत नेले. या निदर्शनाचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना या महिलांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यालाही मज्जाव केला.