काश्मीरमध्ये दहशतवादाच्या मार्गाने प्रॉक्सी लढाई लढणाऱ्या पाकिस्तानने आता भारताविरोधात सायबर युद्ध सुरु केले आहे. सोशल मीडियावरुन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे मेसेज मोठया प्रमाणावर पसरवले जात आहेत. सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या या भारत विरोधी प्रचाराला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची फूस आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

सोशल मीडियाचा वापर करुन भारतविरोधी भावना भडकवायच्या, खासकरुन आखातीमध्ये देशांमध्ये भारताचे नाव खराब करण्याची पाकिस्तानची रणनिती आहे. यासंबंधीचा अहवाल कालच म्हणजे बुधवारी सरकारकडे सोपवण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करुन भारत आणि आखाती देशांच्या संबंधात फूट पाडण्याचा पाकिस्तानची योजना आहे.

भारत आणि आखाती देशांच्या संबंधात मोठी सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांबरोबर संबंध सुधरवण्यावर विशेष भर दिला आहे. पाकिस्तानला हे पहावत नसल्यामुळे आता त्यांनी अशा प्रकारे सायबर युद्धाची सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगची मोठी यादीच भारताकडे आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानकडून आखाती देशांचा वापर होत आहे.

सोशल मीडियावरुन भारताला अशा प्रकारे टार्गेट करण्याची ही पहिली वेळ नाही. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वी तिथे संपर्क यंत्रणा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी सुद्धा पाकिस्तानने सोशल मीडियावरुन अशाच प्रकारे प्रचार केला होता.