News Flash

करोनाशी लढण्यासाठी भारताच्या भात्यात अजून एक अस्त्र! लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता!

रॉश इंडियानंतर आता भारतने अमेरिकन औषध निर्माता कंपनी 'लिली'च्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनला मान्यता दिली आहे. सौम्य आणि मध्यम तीव्रतेच्या करोना रुग्णांवर याचा वापर करता येऊ

एली लिली औषध कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेलला भारतात परवानगी!

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसलेला असताना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा लढा अधिकाधिक कठीण होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे करोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आलं आहे.

शरीरात प्रवेश केलेल्या करोनाचा खात्मा करण्यासाठी अद्याप कोणतंही औषध बनवण्यात आलेलं नाही. मात्र, करोनाच्या विषाणूंचा सामना करणाऱ्या अँटिबॉडी शरीरात तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडीजप्रमाणेच लिली कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडीजमुळे देखील काहीसा असाच परिणाम साधला जाणार आहे.

 

नेमकं हे औषध काय करणार?

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे. या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज करोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला करोनाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.

 

मोफत इंजेक्शन पुरवण्यासाठी प्रयत्नशील!

दरम्यान, लिली कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अधिकाधिक रुग्णांना करोनाचा सामना करण्यासाठी उपचार मिळावेत, यासाठी हे इंजेक्शन मोफत पुरवता येतील का, याची चाचपणी सुरू आहे. त्यासंदर्भात कंपनीकडून केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

कसं आहे रॉश अँटिबॉडी कॉकटेल?

रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स बनवली आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करोना उपचारांसाठी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० इतकी आहे.”

वाचा सविस्तर – करोनावर आता ‘कॉकटेल’ उपचार! एका डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये!

अँटिबॉडी कॉकटेलचा वापर ‘अत्यावश्यक’!

दरम्यान, आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. रमण गंगाखेडकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की,” “सिद्धांतानुसार मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूचे म्यूटेशन होण्याची शक्यता नाही. एखाद्या व्यक्तीस विषाणूऐवजी अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे मध्यम ते गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूची पुनरावृत्ती होण्यापासून टाळता येते. अँटीबॉडी कॉकटेलचा तर्कसंगत उपयोग “अत्यावश्यक” आहे. करोनाची लागण झाल्यानंतर तीन-दहा दिवसांच्या आत अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलचा वापर करावा,” असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल उपचारामुळे करोनाच्या नविन व्हेरियंट्स पासून संरक्षण होऊ शकते असे कोणतेही पुरावे नाहीत, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 4:03 pm

Web Title: after roche india us pharma company eli lilly antibody cocktail on corona patients in india pmw 88
Next Stories
1 राजकीय संघर्ष पेटला! तीन दिवसांत उत्तर द्या; केंद्राचा बंडोपाध्याय यांना इशारा
2 सर्वोच्च न्यायालय : न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “देवाकडे प्रार्थना करतो की…”
3 पंजाब काँग्रेसचा अंतर्गत कलह ; दिल्लीत हायकमांडच्या पॅनलशी चर्चेनंतर सिद्धू म्हणाले…
Just Now!
X