अमेरिका भलेही रशियाबरोबरील संबंधावरून जगभरातील देशांना धमकी देत असली तरी शुक्रवारी भारताने बहुचर्चित S-400 मिसाइलबाबतचा करार केल्यानंतर त्यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत. अमेरिकेने सौम्य धोरण स्वीकारत आपल्याकडून लावण्यात येणार निर्बंध हे वास्तविक रूपात रशियाला दंडित करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. करार झाल्यानंतर काही तासाच्या आत अमेरिकन दुतावासातून पहिली प्रतिक्रिया समोर आली. अमेरिकेच्या निर्बंधाचा हेतू हा सहकारी देशांच्या सैन्य क्षमतांचे नुकसान करण्याचा नसल्याचे नवी दिल्ली स्थित दुतावासाने म्हटले आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी भारताने अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत रशियाबरोबर बहुप्रतिक्षित S-400 हवाई सुरक्षा यंत्रणेचा करार केला. करार झाल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया येईल अशी अपेक्षा करण्यात आली होती. परंतु, अमेरिकन दुतावासाने संयमित प्रतिक्रिया दिली. भारत आणि रशिया यांच्यात शुक्रवारी अवकाश सहकार्याशिवाय ८ मोठे करार झाले. दरम्यान, अमेरिकेने सांभाळून प्रतिक्रिया देत म्हटले की, रशियाविरोधात निर्बंध घालण्याचा उद्देश हा आपल्या सहकाऱ्या सैन्य क्षमतांचे नुकसान करण्याचा नाही.
अमेरिकन दुतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले की, अमेरिकेचा कायदा ‘सीएएटीएसए’चे कलम २३१ वर एका व्यवहाराच्या आधारावर विचार होईल. सीएएटीएसए लागू करण्याचा आमचा हेतू हा रशियाच्या घातक व्यवहाराला दंडित करण्याचा आहे. यामध्ये रशियाच्या संरक्षण क्षेत्राचा निधी रोखण्याचाही समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 3:28 am