माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनंतर आता शोएब अख्तरनेही काश्मीरबाबत विधान केलं आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे दोन्ही देशांनी सोडवायला हवा असं आवाहन शोएबने ट्विटरद्वारे केलं आहे. अखेर केव्हापर्यंत आपण रक्तरंजीत वातावरणात जगणार आहोत, आपण आपल्या मुलांनाही अशाच वातावरणात मोठं करणार का, असा सवाल त्याने केला आहे. काश्मिरी जनतेची इच्छा असेल त्याप्रमाणे आणि संयुक्त राष्ट्राने आखलेल्या मापदंडांनुसार काश्मीरप्रश्न सोडवायला हवा. मुस्लिम असो किंवा नसो पण माणसाचं आयुष्य हे महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने एकमेकांचा तिरस्कार करण्यापेक्षा प्रेम करायला शिकायला हवं असं ट्विट शोएबने केलं आहे. 70 वर्षांनंतरही आपल्या प्रश्नांवर अजून तोडगा का नाही निघाला असा प्रश्न दोन्ही देशांतल्या युवकांनी आपआपल्या अधिका-यांना विचारायला हवा असं शोएब म्हणाला. अजून 70 वर्ष असंच जगायचं आहे का, असा प्रश्न शोएबने ट्विटरद्वारे केला आहे.

सलमान खानला तुरूंगवास झाल्यानंतर शोएब अख्तरने सलमानला पाठिंबा देणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर काश्मीरप्रश्नावर ट्वीट न केल्याने अख्तरला पाकिस्तानमध्ये ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे शोएबने केलेलं हे ट्विट ट्रोलर्सचा राग कमी करण्यासाठी केल्याचं बोललं जात आहे.
1 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये सुरक्षादलाने 12 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आफ्रिदीने काश्मीरमध्ये निष्पाप नागरीक मारले जात आहेत अशं ट्विट केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकरसह अनेक भारतीयंनी आफ्रिदीला लक्ष्य केलं होतं.