रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या एका ३५ वर्षीय कर्मचाऱ्याला लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर रेल्वेच्या रेकॉर्डमधील आपली माहिती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इज्जतनगरच्या वर्कशॉपमध्ये राजेश पांडे ग्रेड वन टेक्निशिअन म्हणून काम करतो. पण २०१७ साली झालेल्या लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर त्याची ओळख बदलली आहे. राजेश पांडेने आता सोनिया पांडे असे नाव धारण केले आहे.

राजेशने उत्तर पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात नाव बदलण्यासाठी अर्ज केला आहे. जुने ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रांवर पुरुष अशी ओळख आहे. त्यामुळे आता स्त्री म्हणून काम करताना अडचणी येतात. पहिल्यांदाच रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने अधिकृत रेकॉर्डमध्ये नाव आणि सेक्समध्ये बदल करण्यासाठी अर्ज केला आहे. बरेली जिल्ह्यात राहणाऱ्या राजेश पांडेने आधी इज्जतनगर वर्कशॉपच्या महाव्यवस्थापकांकडे नाव आणि सेक्स बदलासाठी अर्ज केला होता.

पण समस्या सुटली नाही तेव्हा त्याने गोरखपूर येथील रेल्वे महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात अर्ज केला. हा तांत्रिक मुद्दा असून आम्ही कायदेशीर बाबी तपासत आहोत असे एनईआरचे जनसंर्पक अधिकारी सीपी चौहान यांनी सांगितले. चार बहिणींमध्ये राजेश एकटाच मुलगा होता. २००३ साली वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला रेल्वेमध्ये नोकरी लागली.

लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याआधी त्याने लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. त्याने घटस्फोट घेतला. आता सोनिया पांडे म्हणून अन्य स्त्रियांसारखा मेकअप आणि साडी नेसून राजेश कार्यालयात जातो. मी मोठा झालो तेव्हा माझा आत्मा चुकीच्या शरीरात असल्याचे मला जाणवले. माझ्या मनात स्त्रियांसारखे विचार यायचे. मी स्त्रियांसारखा मेकअप करायचो. माझ्यावर कुटुंबाने लग्नसाठी जबरदस्ती केली. मी माझ्या पत्नीला सत्य काय ते सांगितले त्यानंतर आम्ही घटस्फोट घेतला असे सोनिया पांडे म्हणाली.