चार वर्षांचा रोहान भारतात ह्रदयविकाऱ्याच्या आजाराशी यशस्वीपणे लढला मात्र, पाकिस्तानात जाताच अतिसाराने त्याचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गेल्या महिन्यांत या चिमुकल्याचे वडिल कमाल सिद्दीकी यांना मुलाच्या आजारावर उपचारांसाठी ‘मेडिकल व्हिसा’ वर भारतात यायची परवानगी दिली होती.

कमाल यांच्या मुलावर १४ जुलै रोजी नोयडाच्या जे. पी. रुग्णालयात ह्रदयाच्या आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले होते. त्यानंतर तो आपल्या देशात सुरक्षितपणे परतला होता. मात्र, सोमवारच्या रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडिल कमाल यांनी सांगितले की, रोहान मोठया सर्जरीनंतर ह्रदयाच्या आजाराशी झुंज देत जिंकला होता. मात्र, अतिसारासारख्या सामान्य आजारापुढे तो हारला.

विशेष म्हणजे, पाकिस्तानात रोहानवर इलाज न झाल्याने त्याचे वडिल कमाल यांनी भारताचा मेडिकल व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. याकाळात भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी टि्वट केले की, “माझा मुलगा उपचारांसाठी इतक्या अडचणी का झेलत आहे. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री याचे उत्तर देतील का”.

याची दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ३१ मे २०१७ रोजी या ट्वीटला प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी म्हटले होते, “तुमच्या मुलाला कुठलीही अडचण येणार नाही. यासाठी तुम्ही पाकिस्तानातील उच्चायुक्तांशी संपर्क साधावा. आपल्याला ‘मेडिकल व्हिसा’ देण्यात येईल” त्यांनतर कमाल यांना खरोखरच भारतात जाण्यासाठी ‘मेडिकल व्हिसा’ मिळाला. ३ जून रोजी कमाल यांनी परराष्ट्रमंत्र्यांचे आभारही मानले होते.