पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग हे शनिवारी पहिल्यांदाच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. ते तिथे सैन्य दलाच्या उत्तर कमांडच्या मुख्यालयात जातील आणि त्यानंतर काश्मीरमधील सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनरल दलबीर सिंह सुहाग हे शनिवारी सकाळी उत्तर कमांडचे मुख्यालय असलेल्या उधमपूर येथे जातील तेथून दुपारी ते सीमारेषेवर जातील. भारत-पाक सीमेवरील सुरक्षेची पाहणी करणार असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले.
दरम्यान, भारत पाक सीमेवरील गावांमध्ये तणाव कायम आहे. जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेनजीक गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुरूवारी या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. सुमारे १० हजार लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून यातील ६०० लोक सरकारने बनवलेल्या शिबिरात वास्तव्यास असल्याची माहिती जम्मूचे उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी दिली.
भारतीय लष्कराच्या पथकाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून सुमारे ४० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचबरोबर दहशतवाद्यांचे सात तळ उद्धवस्त केले होते. हे ऑपरेशन सुमारे चार तास चालले होते. दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या पाकिस्तानच्या दोन सैनिकांनाही भारतीय जवानांनी कंठस्नान घातले होते.