जागतिक पाहणीतील निष्कर्ष
विज्ञानाची प्रगती कुठवर होईल हे आज सांगणे जरी कठीण असले तरी त्यातील काही शक्यता मात्र दृष्टिपथात आहेत. विज्ञान कादंबऱ्यातले यंत्रमानव अजून आपल्याकडे फार प्रचलित नसले तरी आगामी काळात अनेक देशात ते पाहायला मिळतील, एवढेच नव्हे तर कंपन्यांच्या बोर्डरूममध्ये ते ‘डावपेच युद्धात’ सहभागी असतील. कृत्रिम बुद्धिमत्तेने वेगळे वळण घेतलेले असेल. येत्या दहा वर्षांत हे घडून येईल असे जागतिक पाहणीत दिसून आले आहे.
किमान अकरा प्रकारचे तंत्रज्ञान पुढे येणार आहे जे जग बदलून टाकेल. त्यात पहिला रोबोटिक फार्मासिस्ट (औषध तज्ज्ञ), त्रिमिती मोटार व शरीरात बसवता येणारा मोबाईल फोन यांचा त्यात समावेश असेल. शरीरात बसवता येणारा मोबाईल फोन तर याच वर्षी अपेक्षित आहे.
यंत्रमानवांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झाली की, ते कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकांमध्ये बसू शकतील ,पण त्याला २०२५ साल उजाडण्याची शक्यता आहे. पहिले त्रिमिती यकृत हे २०२४ पर्यंत उपलब्ध होईल. त्याचे प्रत्यारोपणही करता येईल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक कार्यक्रम मंडळाने ८०० अधिकारी व्यक्तींना जे प्रश्न विचारले त्यातून या शक्यता पुढे आल्या आहेत. क्रांतिकारी तंत्रज्ञानांच्या तारखांचे भाकीत करण्याचा उद्देशही होता पण ते शक्य नाही. २०२५ पर्यंत किमान १० टक्के लोकांच्या कपडय़ांनाच इंटरनेट जोडलेले असेल, असे ९० टक्के जणांना वाटते. तर, ७५ टक्के लोकांच्या मते अमेरिकेत पहिला औषधतज्ज्ञ रोबोट तयार असेल. ६३ टक्के लोकांच्या मते वाहतूक दिव्यांव्यतिरिक्त शहरे असतील, तर ४५ टक्के लोकांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट कंपन्यांच्या बोर्डरूमध्ये असतील. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संचालक डेरेक ओहॅलोरन यांच्या मते तंत्रज्ञान आपले जीवन बदलत आहे व समाजात मूलभूत बदल होत आहेत. तंत्रज्ञान दिवसेंदिवस व्यक्तिगत होत चालले आहे, मोबाईल फोन आता खिशात ठेवता येतात नंतर ते कपडय़ांना बसवता येतील.तंत्रज्ञानात सहा प्रमुख प्रवाह स्पष्ट दिसत आहेत; त्यात लोक व इंटरनेट, संगणन, दूरसंचार व माहितीची कुठेही साठवण, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रचंड माहिती (डाटा), अर्थव्यवस्थेत सहकार्य व विश्वासाचे वातावरण, वस्तूंचे डिजिटल रूप यांचा समावेश असेल.