ब्लू व्हेल या गेममुळे जगभरात अनेक अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भारतातही या गेममुळे अनेक मुलांनी आपले आयुष्य संपवले. या गेमपाठोपाठ आता ‘डेअर अँड ब्रेव्ह’ या गेमचा धोकाही सतावू लागला आहे. या गेममुळे आता पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. या गेममध्ये हरणाऱ्या व्यक्तीला  विवस्त्र फोटो दुसऱ्या  व्यक्तीला पाठवावा लागतो. मुंबईतील एका अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो गुजरातच्या एका तरूणाने मागितल्याची बाब पोलिसांना समजली तेव्हा या गेमबाबत पोलिसांना माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन त्या तरूणाला अटक केली.

‘डेअर अँड ब्रेव्ह’ या गेमची सुरूवात २०१६ मध्ये अमेरिकेत झाली असून भारतातही या गेमचे लोण पसरते आहे. एक ‘इनव्हाइट’ मिळाले की हा गेम खेळता येतो. मुंबईतील अल्पवयीन मुलीला तिचा विविस्त्र फोटो मागितल्या प्रकरणी गुजरातमधून एका २३ वर्षांच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. ‘एशियन एज’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

‘डेअर अँड ब्रेव्ह’ हा गेम ‘ट्रूथ अँड डेअर’ या गेमशी बराचसा मिळताजुळता आहे. ‘ट्रूथ अँड डेअर’ प्रमाणेच दोघांमध्ये हा गेम खेळता येतो आणि जो गेम हरेल त्याला जिंकणारा जे सांगेल ते करावे लागते. या खेळात विविस्त्र फोटो किंवा तशाच व्हिडिओजची मागणी होते आहे. असाच प्रकार घडल्याने मुंबई पोलिसांनी गुजरातमधील तरूणाला अटक केली.