लांब पल्ल्यांच्या धावत्या रेल्वेत गाड्यांमध्ये प्रवाशांना ‘मसाज’ सेवा पुरवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विविध स्तरातून मध्य रेल्वेच्या हा प्रस्तावावर आक्षेप घेण्यात आला होता. ही सेवा योग्य नसल्याचे अनेकांनी रेल्वे प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे या सूचनांचा आदर करीत रेल्वेच्या रतलाम मंडळाने इंदूर येथून सुटणाऱ्या ३९ लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रस्तावित मसाजची सेवा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रेल्वेच्या या प्रस्तावावर आक्षेप घेत यासंबंधी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, धावत्या रेल्वेत महिलांच्यासमोर अशा प्रकारे मसाज करणे हे योग्य नाही. हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. तर दुसरीकडे इंदूरचे भाजपाचे खासदार शंकर लालवानी यांनीही मसाज सेवा हा पातळीहीन निर्णय असून त्याऐवजी प्रवाशांना आवश्यक आरोग्य सेवा आणि डॉक्टर उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर अनेक स्थानिक महिला संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनीही याला विरोध दर्शवला होता.

मंडळाने इंदूर येथून सुटणाऱ्या ३९ लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत प्रवाशांना संपूर्ण शरीराची नव्हे तर फक्त डोक्याची आणि पायाचा मसाज सेवा देण्यात येणार होती. त्यासाठी प्रवाशांकडून १००, २००, ३०० रुपये असे तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये शुल्क आकारले जाणार होते. या सेवेमुळे रेल्वेच्या तिजोरीत वर्षाला २० लाख रुपयांची भर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.