कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांनी उद्या दहशतवादी अजमल आमिर कसाबची जयंती कर्नाटकात साजरी केली तरीही आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका करत अनंतकुमार हेगडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी याआधी टिपू सुलतानच्या जयंतीवरूनही सिद्धरामय्यांवर टीकेचे बाण चालवले होते. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा पुढे करत त्यांनी पुन्हा एकदा सिद्धरामय्यांवर टीका केली आहे. कित्तूरची राणी चिन्नम्माबाबत एखादा महोत्सव सुरु करावा किंवा त्यांची जयंती साजरी करावी अशी इच्छाशक्ती सिद्धरामय्या दाखवत नाहीत. कारण ते टिपू सुलतानसारख्या खुनी माणसाची जयंती साजरी करण्यात धन्यता मानतात, असेही हेगडे यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे झालेल्या एका जनसभेत त्यांनी हा आरोप केला आहे.

टिपू सुलतान नरसंहार करणारा क्रूर आणि बलात्कारी शासक होता त्याच्या जयंती कार्यक्रमाला हजर राहणार नाही असे अनंतकुमार हेगडे यांनी ठणकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना देशभक्तांची जाण नाही असाही आरोप हेगडे यांनी केला. टिपू सुलतान हिंदू विरोधी होता म्हणूनच त्याची जयंती कर्नाटकात साजरी केली जाते असेही हेगडे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.

कर्नाटक हे राज्य गुन्हेगारांसाठी नंदनवन आहे. बंगळुरूमध्ये ९ लाख बांगलादेशी लोकांना आश्रय देण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन तपासून पाहा तिथेही बॉम्ब लावला असेल तर माहित नाही. इतकी अस्थिरता कर्नाटकमध्ये निर्माण झाली आहे असेही हेगडे यांनी म्हटले. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका एप्रिल २०१८ मध्ये होण्याची शक्यता आहे. मे २०१८ मध्ये सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपतो आहे. त्याचमुळे सिद्धरामय्या यांच्यावर भाजपकडून टीका होते आहे. याआधी टिपू सुलतानच्या जयंतीवरून हेगडे यांनी सिद्धरामय्यांवर टीका केली होती आता वेळ पडली तर सिद्धरामय्या दहशतवादी कसाबची जयंतीही साजरी करतील अशी बोचरी टीका हेगडे यांनी केली.