पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, लोकांनी राज्यांमध्ये कोरोना लसीकरण महा अभियानात उत्साहाने सहभाग घेतला. बिहारमध्ये जास्तीत जास्त करोना लसींचे डोस देण्यात आले असून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची सर्वात मोठी भेट दिली आहे. को-विन पोर्टलवर उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री ११:२० पर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशभर दिल्या गेलेल्या एकूण लसींच्या डोसची संख्या ७९ कोटी १३ लाखांहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाच्या विक्रमावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत साधला. या दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री देखील संवाद परिषदेत सहभागी होते. गोव्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला लसीचा एक डोस मिळाला आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत ही एक मोठी गोष्ट आहे. यासाठी गोव्यातील सर्व जनतेचे अभिनंदन असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

“जेव्हा तुमच्या सांगण्यानंतर नागरिकांनी लस घेतली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला का? मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. कारण मी वैज्ञानिक किंवा डॉक्टर नाही. मी असं ऐकलं आहे की लस घेतल्यानंतर १०० पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यानंतर मानसिक संतुलनही बिघडतं असं डॉक्टर सांगतात. पण मला जाणून घ्यायचं आहे की, काल जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी काहींना त्रास झाला हे मी ऐकले आहे. पण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे की अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला आहे. याचं काही लॉजिक असू शकतं का?, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

“जेव्हा लोकांना आम्ही लस दिली तेव्हा त्यांना करोनाला रोखण्यासाठी ही लस देत असल्याचे सांगितले. लसीकरणानंतर तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. लस घेतल्यानंतर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर राखणे हे सुरुच ठेवायचे आहे,” असे मोदींसोबत संवाद साधणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

“तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारताने एका दिवसात अडीच कोटी लसींचा जागतिक विक्रम केला आहे. जगातील अनेक मोठे सक्षम देश सुद्धा असा विक्रम करू शकले नाहीत. अनेक वाढदिवस आले, अनेक वाढदिवस गेले. वाढदिवस साजरा करण्याचे अनेक प्रकार आहेत पण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे खूप खास होते. वैद्यकीय क्षेत्रातील लोक रात्रंदिवस मेहनत करत आहेत. काल केलेला लसीकरणाचा विक्रम ही मोठी गोष्ट आहे,” असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले.