ब्रिटन व जर्मनीपाठोपाठ अजून एक युरोपियन देश बेल्जियम नरेंद्र मोदींच्या गुजरातबरोबर व्यापार करण्यासाठी तयार झाला आहे. बेल्जियमचे भारत भेटीवरील वाणिज्य दूत कार्ल व्हॅन डेन बॉस्ची यांनी पत्रकार परिषदेत मोदींविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली.
“आम्ही मोदींशी व्यापार विषयक चर्चा करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. गुजरातशी आमचे व्यापार संबंध आम्ही पुढे असेच सुरू ठेऊन इतरांचेदेखील युरोपमध्ये स्वागत करू” असे ते म्हणाले.
बेल्जियमचे वाणिज्यदूत बॉस्ची अहमदाबादमध्ये व्हिसा देण्याचे केंद्र सुरू करण्यासाठी आले होते.
“बेल्जिअम हा युरोपियन संघाचा एक भाग आहे. युरोपियन संघाने मोदींविषयी इतक्यात ब-याच सकारात्मक भूमिका घेतल्या आहेत. गुजरात व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे केंद्र आहे. बेल्जिअमदेखील मोदींच्या गुजरातशी व्यापारात हळूहळू चांगली प्रगती करेल. मात्र, भूतकाळ विसरून चालणार नाही. आम्ही मोदींबाबत संतुलित दृष्टिकोन बाळगून आहोत.”, असे बॉस्ची म्हणाले. या भेटीमध्ये नरेंद्र मोदींशी कोणत्याही प्रकारची भेट ठरली नसल्याचे त्यांनी सांगितले.