उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत अनेक मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशातील एका नदीत मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रांज नदीत सहा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केन नदीची उपनदी असलेल्या रुंज नदीमध्ये सहापेक्षा अधिक मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नदीतील पाणी वापरायचे कसे असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. न्यूज १८ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

“आम्ही येथे आंघोळ करतो, तसेच जेव्हा आमच्या गावातील पाण्यातील पंप बंद झाला तर पाणी पिण्यासाठी नदीतील पाणी वापरतो, गुरेढोरेसुद्धा येथे तहान भागवितात पण पाणी दूषित झाल्यामुळे आता काय करायचे? ग्रामपंचायतीला यासंदर्भात कळवले मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असे गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा- पाण्यात टाकून देण्यात आले करोना रुग्णांचे मृतदेह; गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच लागल्याचं भयाण चित्र

यासंदर्भात पन्ना येथील जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. एका ९५ वर्षीय व्यक्तीचा आणि कर्करोगाच्या रुग्णाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्याची माहिती त्यांनी दिली आहे. “मृत्यूनंतर स्थानिक विधीचा भाग म्हणून टाकण्यात आलेले दोन मृतदेह पाण्यातून काढण्यात आले आहेत. त्यांच्यावर योग्य अंत्यसंस्कार करुन त्यांना पुरण्यात आले आहेत”, असे जिल्हाधिकारी संजय मिश्रा यांनी सांगितले.

सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच एक पथक गावात दाखल झालं आहे. अधिकारी पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील गंगेच्या किनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी काही मृतदेह आढळले होते. यापुर्वी बक्सरमध्ये देखील मोठ्या मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले होते. त्यानंतर हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आले असल्याचे बिहारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अधिकाऱ्यांच्या मते बिहारमध्ये मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही. उत्तर भारतातील ग्रामीण भागात करोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे हे कोविड रुग्णांचे मृतदेह असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.