कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये आढळून आल्यानंतर सिद्धार्थ यांची कंपनी कॉफी डे इंटरप्राइजेसच्या शेअरच्या भावात आणखी २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. या अगोदर मंगळवारी सिद्धार्थ हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती, यानंतर देखील कंपनीच्या शेअरच्या भावात २० टक्के घसरण झाली होती.

दरम्यान, बुधवारी शेअर बाजारात कॉफी डे एंटरप्राइजेसच्या शेअरचा भाव १२३.२५ रूपयांच्या पातळीवर आला असून,  कंपनीचा शेअर गत ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर आहे. या अगोदर मंगळवारी सिद्धार्थ हे बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कंपनीचे शेअर १९४ रूपयांवरून १५४.०५ रूपयांवर आले होते.
या दोन दिवसात कॉफी डे एंटरप्राइजेसच्या गुंतवणुकदारांना २८०० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा फटका बसला आहे. केवळ दोन दिवसात कंपनीच्या बीएसईच्या बाजार मुल्यात २८३९ कोटींची घसरण झाली आहे. बुधवारी कंपनीचे बाजार मुल्य २६०३.६८ कोटी रूपये राहिले.

देशभरातील सीसीडी आउलेट्स  दिवसभरासाठी राहणार बंद
आपल्या मालकाच्या मृत्यूमुळे सीसीडीने बुधवारी (आज) दिवसभरासाठी देशभरातील  आउलेट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील जवळपास २४० शहरांमधील सीसीडीचे एकूण १७५० रिटेल आउटलेट्स बंद राहणार आहेत.