उत्तर प्रदेशातील १६ पैकी १४ पालिकांवर भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत देशात खऱ्या अर्थाने विकास पुन्हा एकदा विजयी झाला असल्याची प्रतिक्रिया ट्विट केली आहे. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेला विजय हा नोटाबंदी आणि जीएसटीचा अपप्रचार करणाऱ्यांना बसलेली सणसणीत चपराक आहे. निदान आता तरी केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांची तोंडे बंद होतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी लागलेल्या निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. आज मिळालेला विजय हा येत्या काळात आपल्याला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या विजयांमुळे तिथे महापौरही भाजपचाच बसणार आहे. यामुळे विकास पुन्हा एकदा विजयी झाला असे प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे.

तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. गुजरात जिंकायला निघालेले अमेठीत हरले असा ट्विट आदित्यनाथ यांनी केला आहे. तसेच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.