पत्नीने विश्वासघात केल्यानंतर बदला घेण्याच्या भावनेने पछाडलेला पती नक्षलवादी बनल्याची घटना तेलंगणमध्ये समोर आली आहे. जाक्कुला बाबू (३८) असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. जाक्कुला बाबू मूळचा तेलंगणच्या राजान्ना सरसिला जिल्ह्यातला. जाक्कुला बाबू दुबईमध्ये नोकरीला होता. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजल्यानंतर तो भारतात परतला व त्याने थेट नक्षलवादाची कास धरली.

आपण मोठया कष्टाने कमावलेला पैसा पत्नीने तिच्या प्रियकरावर उधळल्याचे समजल्यानंतर त्याला प्रचंड दु:ख झाले. सरसिलाचे पोलीस अधीक्षक राहुल हेगडे यांनी सांगितले कि, जाक्कुला बाबू सीपीआयएमएल जनशक्तीच्या संपर्कात होता. दुबईमध्ये तो बांधकाम मंजूर म्हणून काम करायचा. २०१६ साली भारतात परतल्यानंतर तो बंदी असलेल्या संघटनेमध्ये सहभागी झाला.

त्याने सिंचन कंत्राटदारांकडून खंडणी सुद्धा वसूल केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. ६ ऑक्टोंबर २०१७ रोजी पोलिसांनी बाबू आणि त्याचा सहकारी ठोकाला श्रीकांतला अटक केली. जाक्कुला बाबूची जनशक्ती संघटनेच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडून अमेरिकन बनावटीची पिस्तुल, १५ काडतूस आणि ४४,६०० रुपयाची रोकड जप्त केली.