मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर आता एक नवा वाद उफाळून आला आहे. फाशी दिल्यानंतर याकूबचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला होता. मग, सरकारने अफजल गुरूबाबत दुजाभाव का केला, असा सवाल करत काश्मीरमधील राजकीय नेत्यांनी केंद्र सरकारकडे अफजल गुरूचे अवशेष परत करण्याची मागणी केली आहे. काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षाने एकमुखाने ही मागणी उचलून धरली असून न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे सांगितले. दोन भिन्न व्यक्तींसाठी वेगवेगळा न्याय असू शकत नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे म्हणणे आहे. दुषित पूर्वग्रह आणि राजकारणामुळे व्यवस्थेने दुजाभाव करू नये. याकूब आणि अफजल गुरू यांच्याबाबतीत घेण्यात आलेल्या या दुटप्पी भूमिकेमुळे काश्मीरमध्ये जनतेमध्ये भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रया नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते आगा सय्यद यांनी व्यक्त केली. मात्र, आमचा पक्ष अफजल गुरूचे अवशेष परत देण्याच्या मागणीवर ठाम राहणार असून त्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न करू, असेही त्यांनी म्हटले. तर काश्मीरमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या पीडीपीच्या मेहबुब बेग यांनीदेखील सरकारने मानवतेच्या दृष्टीकोनातून या मागणीचा विचार केला पाहिजे, असे म्हटले. अफजल गुरूचे अवशेष त्याच्या कुटुंबियांना परत दिल्यास काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असे मेहबुब बेग यांनी म्हटले.