News Flash

पदभार स्वीकारताच येडियुरप्पांनी पोलीस खात्यात केले महत्वाचे फेरबदल

कर्नाटकात एकाबाजूला जोरदार सत्तासंघर्ष रंगलेला असताना मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पदभार स्वीकारताच कायदा विभाग आणि पोलीस खात्यात काही महत्वाचे फेरबदल केले आहेत.

येडियुरप्पा (संग्रहित छायाचित्र)

कर्नाटकात एकाबाजूला जोरदार सत्तासंघर्ष रंगलेला असताना मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पदभार स्वीकारताच कायदा विभाग आणि पोलीस खात्यात काही महत्वाचे फेरबदल केले आहेत. येडियुरप्पा एकदिवसाचे मुख्यमंत्री ठरतील असे काँग्रेसने म्हटले असले तरी येडियुरप्पा सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

येडियुरप्पांनी मधुसूदन आर नाईक यांच्याजागी प्रभुलिंगा के नवाडगी यांची कर्नाटकच्या अॅडव्हकोट जनरल पदावर नियुक्ती केली आहे. नवाडगी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल आहेत. सरकार स्थापनेसाठी येडियुरप्पांना निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना नवाडगी यांची अॅडव्हकोट जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

येडियुरप्पांनी पोलिसांच्या गुप्तचर विभागात महत्वपूर्ण बदल केले आहेत. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेत हा विभाग महत्वपूर्ण समजला जातो. रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमन कुमार पांडे यांना गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे. भाजपाच्या तीन आमदारांनी आधीचे काँग्रेस सरकार आपले फोन टॅप करत होते असा आरोप केल्यानंतर ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे समर्थन करणारे आमदार रामगनागारा जिल्ह्यातील ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते त्या जिल्ह्यात के.अण्णामलाई यांची पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे पण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना अजून आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आहे. पण राज्यापालांनी मोठा पक्ष म्हणून भाजपाला पहिली संधी दिली आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सत्ताधारी भाजपाला दिले आहेत.

बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, ही भाजपाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात राज्यपाल वजूभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. भाजपाच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी, काँग्रेसच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, जनता दल सेक्यूलरच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:11 pm

Web Title: after yeddyyurappa take charge changes in police department
टॅग : Bjp
Next Stories
1 येडियुरप्पांचा फैसला उद्या; कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी घ्या: सुप्रीम कोर्ट
2 मोदींच्या कृपेने राज्यपाल झालेले वजुभाई न्यायपालिकेच्या तत्वाला जागले नाहीत – शिवसेना
3 बलात्कार पीडितेने साक्ष फिरवली; हायकोर्टाने दिले भरपाई वसूलीचे आदेश
Just Now!
X