संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर तिहार कारागृहात जिथे दफन करण्यात आले, त्या ठिकाणी जाऊन नमाज पठण करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी मंगळवारी माहिती दिली.
अफजलला फाशी दिल्यानंतर लगेचच त्याचा मृतदेह तिहार कारागृहात दफन करण्यात आला. त्याचा मृतदेह आमच्याकडे द्यावा, अशी त्याच्या कुटुंबियांची मागणी होती. मात्र, सरकारने फाशी दिल्यानंतर लगेचच त्याचा मृतदेह कारागृहातच दफन केला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी दफन केलेल्या ठिकाणी जाऊन नमाज पठण करण्याची मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना, या मागणीबाबत विचार केला जाईल, असे सांगितले होते.
अफजलच्या जवळच्या नातेवाईकांची तिहार कारागृहात येऊन नमाज पठण करण्याची इच्छा असेल, तर आमची काहीही हरकत नाही, असे सिंग म्हणाले. कोणत्या दिवशी अफजलच्या नातेवाईकांना तिहार कारागृहात बोलवायचे, याचा निर्णय तिहार कारागृह प्रशासन घेणार आहे.