जयपूर नंतर आता भाजपच्या भोपाळच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक मुस्लिमांना त्यांच्या पारंपारिक वेशामध्येच नरेंद्र मोदी यांच्या सभेला हजेरी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे अल्पसंख्याक जोडो अभियान

गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष राजनाथसिंग आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी येत्या २५ सप्टेंबरला भोपाळ दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या सभेसाठी जास्तित जास्त पारंपारिक वेशातील मुस्लिम कसे हजर राहातील याकडे भाजपने लक्ष दिले आहे.
नरेंद्र मोदींच्या भोपाळमध्ये होऊ घातलेल्या सभेसाठी ५०,००० मुस्लिम हजेरी लावणार असून, त्या पैकी ५००० महिला असणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.
सभेसाठी येणार असलेल्या मुस्लिम पुरूषांना ठरवून गोल टोप्या आणि महिलांना बुरखे परिधान करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. “ते आपापल्या टोप्या व बुरखे घालून येणार आहेत. मात्र, ते जास्तित-जास्त मुस्लिम कसे दिसतील यावर आम्ही भर दिला आहे.” असे भाजपचे मध्यप्रदेश अल्पसंख्यांक शाखा प्रमुख हिदायतुल्ला शेख यांनी सांगितले. भाजपने त्यांना सभास्थळी एकत्र बसण्याचे निर्देश दिले आहेत.