16 December 2017

News Flash

पुन्हा युव‘राज’!

* भारताचा पाकिस्तानवर ११ धावांनी विजय * ट्वेन्टी-२० मालिका १-१ने बरोबरीत * युवराजची ७२ धावांची घणाघाती

पीटीआय, अहमदाबाद | Updated: December 29, 2012 4:48 AM

* भारताचा पाकिस्तानवर ११ धावांनी विजय
* ट्वेन्टी-२० मालिका १-१ने बरोबरीत
* युवराजची ७२ धावांची घणाघाती खेळी
भारतीय संघाची साडेसाती काही केल्या संपता संपत नाही. मायदेशातील कसोटी मालिकेत इंग्लंडकडून पराभव पत्करल्यानंतर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात युवराज सिंग भारताच्या मदतीला धावून आला होता. पाकिस्तानविरुद्ध युवराज पुन्हा एकदा भारतीय संघासाठी तारणहार ठरला आहे. युवराजची ७२ धावांची घणाघाती खेळी आणि अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानवर दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने इंग्लंडपाठोपाठ पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत सोडवली.
युवराजने ३६ चेंडूंत सात षटकारांची आतषबाजी करत भारताला १९२ धावसंख्येवर नेऊन ठेवले. हे लक्ष्य पेलताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सुरेख सुरुवात करून दिली. कर्णधार मोहम्मद हाफीझ याने ५५ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजयाच्या आशा दाखवून दिल्या, पण अशोक दिंडासह वेगवान गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १८१ धावांवर रोखण्यात भारताने यश मिळवले.
नासीर जमशेद आणि अहमद शहझाद यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेत पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यांनी १० षटकांत ७५ धावा जोडल्या. जमशेदने चार चौकार आणि एक षटकारासह ४१ धावांची खेळी केली. शहझादने त्याला चांगली साथ देत ३१ धावा फटकावल्या. त्यानंतर मोहम्मद हाफीझने सहा चौकार आणि तीन षटकार लगावत विजयाच्या दिशेने कूच केली. अशोक दिंडाने १९व्या षटकात हाफीझ (५५) आणि कामरान अकमल यांचा अडसर दूर केला. अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज असताना इशांत शर्माने आठ धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, युवराज सिंगच्या घणाघाती खेळीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९२ धावा उभारल्या होत्या. षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या युवराजने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील कारकिर्दीतील सर्वोत्तम ७२ धावांची खेळी साकारली. पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत युवराजने ३६ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली.
युवराजने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या ९७ धावांच्या भागीदारीमुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्येची नोंद करता आली. पाकिस्तानचे प्रमुख अस्त्र असलेला फिरकीपटू सईद अजमल याला ‘लक्ष्य’ करत युवराजने चांगलाच चोप दिला. अजमलच्या १९व्या षटकात युवराजने षटकारांची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याआधी गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे भारताला दमदार सुरुवात करून दिली. ड्राइव्ह आणि कटचे सुरेख फटके लगावत या दोघांनी पहिल्या पाच षटकांत ४४ धावा फटकावल्या. पाकिस्तानतर्फे उमर गुलने चार बळी मिळवले.
 संक्षिप्त धावफलक : भारत- २० षटकांत ५ बाद १९२ (युवराज सिंग ७२, महेंद्रसिंग धोनी ३२; उमर गुल ३७/४) विजयी वि. पाकिस्तान- २० षटकांत ७ बाद १८१ (मोहम्मद हाफीझ ५५, नासीर जमशेद ४१, अहमद शहझाद ३१; अशोक दिंडा ३६/१).
सामनावीर : युवराज सिंग.
मालिकावीर : मोहम्मद हाफीझ.   

First Published on December 29, 2012 4:48 am

Web Title: again yuvraj singh
टॅग Cricket,Sports