केरळमधील दोन मच्छिमारांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन नाविकांना भारतात परत न पाठविण्याच्या इटलीच्या निर्णयानंतर केंद्र सरकार त्या देशाच्या राजदूतांना परत मायदेशी पाठविण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. 
केरळच्या समुद्रात दोन भारतीय मच्छिमारांची हत्या केल्याचा आरोप असणाऱया इटलीच्या दोन नाविकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी भारतात न पाठविण्याचा निर्णय इटलीतील सरकारने घेतला. मॅसिमिलीआनो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन अशी या नाविकांची नावे आहेत. या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले. इटलीची भूमिका अस्वीकारार्ह असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी केले होते.
इटलीच्या भूमिकेमुळे भारताच्या झालेल्या नाचक्कीला उत्तर देण्यासाठी इटलीचे राजदूत डॅनिअल मॅनकिनी यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी नोटीस बजावली. त्यांना परत मायदेशी पाठविले जाऊ शकते. परराष्ट्र व्यवहार सचिव रंजन मथाई यांनी मंगळवारी दिवसभर विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर चर्चा केली. त्यावेळी इटलीकडून झालेल्या फसवणुकीचा कसा विरोध करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये इटलीबरोबर मर्यादित राजनैतिक संबंध ठेवणे, इटलीतील भारतीय राजदूतांना मायदेशी परत बोलावणे, तेथील कार्यालय बंद करणे, इटलीबरोबरचे सर्व व्यावसायिक कंत्राटे रद्द करून संबंध तोडणे, भारतीय नेत्यांचे अधिकृत इटली दौरे रद्द करणे इत्यादी पर्यायांचा विचार करण्यात आला. इटलीविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल का, याचीही कायदा मंत्रालयातील अधिकाऱयांकडून चाचपणी करण्यात येते आहे.