News Flash

योगींविरोधात प्रक्षोभ

देशभरातील तीव्र संतापानंतर महिलांच्या सुरक्षेची हमी

योगींविरोधात प्रक्षोभ
(संग्रहित छायाचित्र)

हाथरस बलात्कार प्रकरणानंतर देशभरातील उसळत्या प्रक्षोभामुळे दबावाखाली आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी महिलांच्या सुरक्षेची हमी दिली. ‘महिलांच्या स्वाभिमानास धक्का पोहोचवण्याचा विचारही कोणी केला, तर त्याला सर्वनाशास सामोरे जावे लागेल’, अशी घोषणा योगी यांनी केली.

उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असूून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना जबर शिक्षा दिली जाईल, असे ट्वीट आदित्यनाथ यांनी केले आहे. हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळल्यानंतर योगी आदित्यनाथ अडचणीत सापडले आहेत. ‘आया-मुलींना त्रास देणाऱ्यांना इतकी जबर शिक्षा भोगावी लागेल की पुन्हा तसे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

पीडित मुलीचा मृतदेह तिच्या नातलगांच्या ताब्यात न देता परस्पर मध्यरात्री अंत्यसंस्कार उरकण्याच्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृत्यानंतर देशभर तीव्र पडसाद उमटले.

मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास गेलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले. शुक्रवारीही हाथरसला निघालेल्या काही नेत्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतले.

देशभरातून योगी यांच्यावर राजकीय दबाव वाढू लागल्यानंतर त्यांनी शुक्रवारी मौन सोडले आणि ‘सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे’, अशी ग्वाही दिली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल. त्यांना इतकी जबर शिक्षा भोगावी लागेल की भविष्यात महिलांवर अत्याचार करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असे आदित्यनाथ म्हणाले.

प्रियंका यांची मंदिरात प्रार्थना

पीडित कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिल्लीतील वाल्मीकी मंदिरातील प्रार्थनेत सहभाग घेतला. ‘मुलीचे कुटुंब असहाय आहे. पोलिसांनी हिंदू परंपरेनुसार पीडित मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करू दिले नाहीत. पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, असे प्रियंका म्हणाल्या.

पुन्हा धक्काबुक्की

हाथरसमध्ये गेलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन आणि अन्य खासदारांनाही शुक्रवारी धक्काबुक्की करण्यात आली. पीडित मुलीचे मूळगाव बुलगढी येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांना कोणालाही भेटू दिले जात नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला.

नेते, माध्यमांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू द्या – उमा भारती

हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या संशयास्पद कृतीमुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेत्यांना द्यावी, अशी विनंती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री योगी यांना केली.

* पोलीस अधीक्षकासह पाच निलंबित

हाथरस बलात्कार-हत्या प्रकरण हाताळण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांच्यासह पाच पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी निलंबित केले. विशेष तपास पथकाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

* बुलगढीची नाकाबंदी

पीडित मुलीचे गाव बुलगढीला पोलिसांनी वेढा घातला असून गावाची पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. गावाबाहेरील कोणालाही आत सोडले जात नाही. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावकरीही बाहेर येऊ  शकत नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. विशेष तपास पथक चौकशी करत असून त्यात अडथळे येऊ  नयेत, यासाठी कोणालाही गावात जाऊ  दिलेले नाही, असे स्पष्टीकरण पोलीस उपमहासंचालक प्रवनकुमार यांनी दिले. पीडित मुलीच्या नातलगांशी दूरध्वनीवरूनही बोलू दिले जात नसल्याचा आरोप आंदोलक नेत्यांनी केला.

दिल्लीत निदर्शने जंतरमंतरवर फक्त १०० लोकांनाच जमण्याची परवानगी असली तरी, योगी सरकारचा निषेध करण्यासाठी शेकडो निदर्शकांनी घोषणाबाजी केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी इंडिया गेटवर संध्याकाळी ५ वाजता एकत्र येण्याची हाक दिली होती. मात्र, इंडिया गेट परिसरात जमावबंदी लागू केल्यामुळे तीन किमीवर असलेल्या जंतरमंतरवर भीम आर्मीचे कार्यकर्ते जमले. या आंदोलनात आम आदमी पक्षही सहभागी झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माकपचे नेते सीताराम येचुरी,  विद्यार्थीनेता कन्हैयाकुमार, अभिनेत्री स्वरा भास्कर हे निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना इतकी जबर शिक्षा भोगावी लागेल की तसे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे.

– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश सरकार सत्य लपवण्यासाठी खालच्या पातळीवर उतरले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवले आहे.

– राहुल गांधी, काँग्रेस नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 12:23 am

Web Title: agitation against cm yogi adityanath abn 97
Next Stories
1 देशात अराजक, अत्याचाराचे वातावरण!
2 आसाममध्ये जादूटोण्याच्या संशयावरून दोघांची हत्या
3 ‘एच १ बी’ व्हिसा बंदी आदेशास अमेरिकी न्यायालयाची स्थगिती
Just Now!
X