डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी अध्यक्षपदी निवडून आले असले तरी त्यांच्याविरोधात सुरू असलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. हजारोंच्या संख्येने अमेरिकी नागरिक या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत.

न्यूयॉर्क आणि शिकागो या मोठय़ा शहरांमध्ये ट्रम्पविरोधी आंदोलनांनी जोर धरला आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदापासून दूर व्हावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. न्यूयॉर्क युनियन स्क्वेअर आणि ट्रम्प टॉवर येथे आंदोलकांनी मोर्चा काढला.

चित्रपट दिग्दर्शक मायकेल मूर यांनी ट्रम्प यांनी अध्यक्षपद सोडावे अशी मागणी केली आहे. ट्रम्प यांच्याकडून मुलांना वंशविद्वेष, धर्माधता आणि लैंगिकता यांचेच शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेचे भविष्यच धोक्यात आहे, असेही मूर म्हणाले.

लॉस एंजल्समध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा काढला. ट्रम्प यांच्या तत्त्वांचा या वेळी जाहीर निषेध करण्यात आला. मुस्लीमद्वेष, महिलांबाबतची वक्तव्ये यावर आंदोलकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.