वाराणसी शहरात सभा घेण्यास आणि गंगामातेची आरती करण्यास नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून वाराणसीतील बनारस हिंदू विश्व विद्यालयाबाहेर निदर्शने करीत आहेत. भाजपचे नेते अरूण जेटली, मुख्तार अब्बास नक्वी, अनंतकुमार, अमित शाह यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय आणि उत्तर प्रदेशातील नेते आणि हजारो कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी निवडणूक अधिकाऱयांच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत.
निवडणूक अधिकाऱयांच्या निर्णयाविरोधात दिल्लीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर ‘न्याय मार्च’ काढला आहे. पक्षाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्त्व केले. दिल्ली पोलीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. वाराणसीतील निवडणूक अधिकारी राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप नायडू यांनी केला. मोदींची जाहीरसभा झालेल्या कोणत्याही ठिकाणी आतापर्यंत हिंसाचर किंवा दंगा झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, भाजप वाराणसीतील निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. या निवडणुकीत मोदी आणि मुलायम सिंह जातीय कार्ड वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगून मायावती म्हणाल्या, भाजप आणि समाजवादी पक्षाने जाणूनबुजून रचलेले हे नवे षडयंत्र असून, ही सर्व नाटकबाजी आहे. या पद्धतीने निवडणुकीचे वातावरण गरम करून हिंदू-मुस्लिम धार्मिक रंग देऊन त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून करण्यात येतो आहे.
फोटो गॅलरी : भाजप कार्यकर्त्यांचे वाराणसीत धरणे आंदोलन