बेकायदा मोर्चे काढण्यावर घालण्यात आलेली बंदी झुगारून  हाँगकाँगमधील आंदोलकांनी लोकशाही समर्थनार्थ लढा तीव्र केला. एका आंदोलकाला भोसकण्यात आल्याच्या घटनेने आंदोलक अधिक त्वेषाने व जास्त संख्येने उतरले होते. सिम शा सुई या शॉपिंगसाठी प्रसिद्ध जिल्ह्य़ात आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती, पण तरी हजारो लोक रस्त्यावर उतरले. चीन समर्थक नेत्यांवर दबाव वाढवण्यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.

गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हे आंदोलन व राजकीय अस्थिरता सुरू आहे. सप्ताहअखेरीस मोर्चाचे नेतृत्व करणारे नेते जिमी श्ॉम यांना भोसकण्यात आले असून  त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. शनिवारी रात्री लोकशाहीवादी आंदोलनाची पत्रके वाटणाऱ्या एकावर हल्ला करण्यात आला, त्याच्या मान व पोटात भोसकण्यात आले. रविवारी कडक सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी लोक छत्र्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. हल्ल्यांमुळे आम्ही दबून जाणार नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अधिकाऱ्यांनी मात्र नियोजित मोर्चावर बंदी घातली होती. एका महिला आंदोलकाने सांगितले,की ते जेवढी दडपशाही करतील तेवढा आम्ही विरोध करू.पोलिस आम्हा सर्वाना म्हणजे हजारो लोकांना अटक करू शकत नाहीत. फिलीप सोई या आंदोलकाच्या मते काही कार्यकर्त्यांना भोसकण्यात आले असले तरी आंदोलकांची संख्या कमी होता कामा नये.हाँगकाँगच्या लोकांनी निवडलेला नेता असलेले सरकार आम्हाला हवे आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने लादलेले सरकार नको आहे.

सध्या मोठे मोर्चे शांतपणे चालले आहेत पण लहान मोर्चातील लोक हिंसाचार करीत आहेत. त्यांनी सबवेमधील काही स्टेशनवर हल्ला केला. सिम शा सुई पोलिस स्टेशनसमोर कट्टर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. हाँगकाँगमधील काही गुंम्ड टोळ्यांनी बीजिंग समर्थकांशी संधान  बांधले आहे. निदर्शकांच्या मते गुन्हेगारी टोळयांनी जे हल्ले चालवले आहेत तो सफेद दहशतवादच आहे.