भारताने अग्नि १ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहे. अण्वस्त्रवाहक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र असून ते ७०० कि.मी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ओदिशा किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी क्षेत्रात म्हणजे अब्दुल कलाम बेटांवर ( व्हीलर्स आयलंड) ही चाचणी घेण्यात आली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून त्यात घन प्रणोदके म्हणजे इंधने वापरलेली आहेत. सकाळी १० वाजता एकात्मिक चाचणी क्षेत्रावर ही चाचणी चौथ्या क्रमांकाच्या तळावरून करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडसाठी प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही चाचणी करण्यात आली. ती अत्यंत अचूक ठरली आहे असे सूत्रांनी सांगितले. विशिष्ट कालांतराने स्ट्रॅटेजिक कमांडच्या प्रशिक्षणासाठी या चाचण्या घेतल्या जातात, रडारच्या मदतीने या उड्डाणाचे निरीक्षण करण्यात आले. इलेक्ट्रोऑप्टिक उपकरणे व दूरसंवेदन केंद्रे यांच्या मदतीने उड्डाणाचे निरीक्षण करण्यात आले. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. हे क्षेपणास्त्र लष्करात आधीच तैनात करण्यात आले असून, त्यांची अचूकता, पल्ला व घातकता कामगिरी चांगली आहे. संरक्षण संशोधन व विकास केंद्राच्या क्षेपणास्त्र विकास प्रयोगशाळेने भारत डायनॅमिक्स व इतर संस्थांच्या मदतीने हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. अग्नि१ क्षेपणास्त्राची चाचणी ११ सप्टेंबर २०१४ रोजी याच प्रक्षेपण तळावरून घेण्यात आली होती व ती यशस्वी झाली होती. या क्षेपणास्त्रावर दिशादर्शन प्रणालीही बसवण्यात आली आहे.