मध्यम पल्ल्याच्या ‘अग्नि २’ या क्षेपणास्त्राची चाचणी आज येथील ओडिशाच्या किनाऱ्यावरील व्हिलर बेटांवर यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्याचा पल्ला २००० कि.मी आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी चलत प्रक्षेपकावरून करण्यात आली. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी एकात्म चाचणी क्षेत्राच्या संकुल चार मधून ते सोडण्यात आले, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.
‘अग्नि-२’ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून ते सैन्यदलात अगोदरच दाखल करण्यात आले आहे.आजची चाचणी ही लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडतर्फे करण्यात आली. त्यात तांत्रिक साहाय्य संरक्षण संशोधन व विकास संस्थेने केले होते. प्रशिक्षण चाचणी असे त्याचे स्वरूप होते. दोन टप्प्यांचे हे क्षेपणास्त्र अतिअचूक दिशादर्शक प्रणालीने सुसज्ज असून त्यात ‘स्टेट ऑफ द अर्थ कमांड’चाही समावेश आहे. त्याची नियंत्रण प्रणाली ही घनप्रणोदकावर चालणारी आहे.
या क्षेपणास्त्राचा संपूर्ण प्रवास हा अत्याधुनिक रडारच्या मदतीने टिपण्यात आला, असे संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी सांगितले. अग्नि -२ हे भारताच्या अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्र असून त्यातील अग्नि-१ चा पल्ला ७०० कि.मी, अग्नि ३चा पल्ला ३००० कि.मी, अग्नि-४ चा पल्ला ४००० कि.मी तर अग्नि-५ चा पल्ला हा ५००० कि.मी आहे. अग्नि-२ क्षेपणास्त्राची याअगोदरची चाचणी गेल्या ९ ऑगस्ट रोजी झाली होती.
अग्नि-२ क्षेपणास्त्र
उंची २० मीटर
टप्पे-२
प्रणोदक(इंधन)-घन
उड्डाणावेळी वजन- १७ टन
पेलोड-१००० किलो
अंतर- २००० कि.मी
निर्माते-अॅडव्हान्सड सिस्टीम्स लॅबोरेटरी
 भारत डायनॅमिक लिमिटेड