उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये तिहेरी तलाकची एक घटना समोर आली आहे. तलाक देण्याचं कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हुंड्यात कार न दिल्याने लग्नानंतर केवळ तासाभरात संबधित व्यक्तीने आपल्या पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिलेने शुक्रवारी आग्र्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

आग्र्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा राजस्थानमध्ये राहणाऱ्या पपन नावाच्या व्यक्तीशी विवाह ठरला होता. १५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता त्यांचं लग्न पार पडलं. परंतु लग्न झाल्यानंतर रात्री एक वाजता नवऱ्या मुलाची सलामीचा विधी सुरू होता. परंतु त्याचवेळी पपनने मुलीच्या वडिलांकडे कारची मागणी केली. परंतु आपली परिस्थिती नसल्याचं सांगत मुलीच्या वडिलांनी कार देण्यास नकार दिला. त्यानंतर पपनने मुलीला तलाक देण्यात धमकी दिली.

लग्नाला अवघे काही तास झाले असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातलगांनी मुलाल समजावण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यानंतर पंचायतदेखील भरवण्यात आली. असं असतानाही पपनने मुलीला रात्री तिहेरी तलाक दिला. त्यानंतर शुक्रवारी मुलीच्या वडिलांनी आणि मुलीने पोलीस ठाण्यात पपन विरोधात तिहेरी तलाकची तक्रार दाखल केली. दरम्यान, संबंधितावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. आग्र्यात तिहेरी तलाकची ही तिसरी घटना आहे.