‘रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड’ या संस्थेने करोनावरील ‘स्पुटनिक ५’ ही लस भारताच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला वितरणासाठी देण्याचे ठरवले आहे. त्याबाबत डॉ. रेड्डीज व रशियाची संस्था यांच्यात करार झाला आहे. रशियाची संस्था भारतीय कंपनीला १० कोटी डोस देणार असून नंतर ही कंपनी भारतात त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करणार आहे.

केंद्रीय औषध नियंत्रकांच्या परवानगीशिवाय रेड्डीज लॅबोरेटरिजला चाचण्या करता येणार नाहीत. रशियाची स्पुटनिक ५ ही सर्दीच्या अ‍ॅडेनोव्हायरस विषाणूपासून बनवलेली लस नक्कीच सुरक्षित आहे, असे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव यांनी सांगितले.

रेड्डी लॅबोरेटरीजचे सह अध्यक्ष जी.व्ही प्रसाद यांनी सांगितले, की आम्ही या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करणार आहोत. त्यातून कोविड विरोधात विश्वासार्ह असा पर्याय उपलब्ध होणार आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही.के पॉल यांनी रशियन लसीच्या चाचण्या भारतात करण्यास अनुकूलता दर्शवली होती. त्यात २-४ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले.