शेतकरी आंदोलकांबरोबर उद्या चर्चेची दहावी फेरी

नवी दिल्ली : सरकार व आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेची दहावी फेरी मंगळवारी होऊ घातली असताना, नव्या शेती कायद्यांबाबतची ‘दुराग्रही’ भूमिका सोडून कलमनिहाय चर्चेसाठी यावे, असे आवाहन कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी पुन्हा एकदा आंदोलक शेतकरी नेत्यांना केले.

‘सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असताना, हट्टीपणा बाळगण्याचे काहीच कारण नाही’, असे तोमर यांनी मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्य़ातील आपल्या  मतदारसंघात रवाना होण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले.

१९ जानेवारीला होणाऱ्या यापुढील चर्चेत शेतकरी नेत्यांनी कायद्याबाबत कलमनिहाय (क्लॉज बाय क्लॉज) चर्चा करावी अशी सरकारची इच्छा आहे. कायदे रद्द करण्याची मागणी वगळता इतर पर्यायांवर ‘गंभीरपणे आणि खुल्या दिलाने’ विचार करण्यास सरकार तयार आहे, असे तोमर म्हणाले.

हुजुर साहिब नांदेड- अमृतसर एक्स्प्रेसने आपल्या मतदारसंघाकडे रवाना झालेले तोमर हे त्यांच्या शीख सहप्रवाशांसोबत लंगरचे जेवण घेत असल्याचे दिसत होते. पंजाबमधील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यांनी याद्वारे सद्भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

सरकारने शेतकऱ्यांना काही सवलती देऊ केल्या आहेत, मात्र शेतकरी नेत्यांनी लवचीकता दाखवली नसून, ते सतत कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत, असे तोमर म्हणाले. सरकार संपूर्ण देशासाठी कायदे करते. अनेक शेतकरी, तज्ज्ञ आणि इतर संबंधित यांनी या कायद्यांना पाठिंबा दर्शवला आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आतापर्यंत केंद्र आणि ४१ शेतकरी संघटना यांच्यात औपचारिक चर्चेच्या ९ फेऱ्या झाल्या आहेत, मात्र  आंदोलन संपवण्यासाठी त्यातून काही ठोस निष्पन्न झाले नाही.