मोदी सरकारनं संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषि विधेयकांवरून देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. देशातील शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. विधेयक विरोधाचे पडसाद उमटले असून, सरकारनं बाजार समित्या व हमीभावानं शेतमालाची खरेदी या दोन्हींचा कायद्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या मागणीची आठवण करून दिली आहे.

नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असून, पंजाब, हरयाणात या विधेयकांविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार : राहुल गांधी

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तिन्ही कृषि विधेयकांवरून टीका करताना पंतप्रधान मोदींना ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या मागणीची आठवण करून दिली आहे.

“मोदीजी स्वतःच मोदीजींचं म्हणणं का ऐकत नाहीत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं होतं की, हमीभाव अर्थात एमएसपीला कायदेशीररित्या अधिकृत करायला हवं. मग आता काय बदललं आहे मोदीजी? शेतकऱ्यांना का रक्ताचे अश्रूंनी रडवता आहात?,” असा सवाल सुरजेवाला यांनी केला आहे.

आणखी वाचा- मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर; ठिकठिकाणी रस्ते, रेल्वे वाहतूक बंद

आणखी वाचा- मोदी सरकारविरोधात शेतकरी किती वेळा उतरले रस्त्यावर?

“शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं तर दूरच, संसदेमध्ये त्यांच्या प्रतिनिधींचाही आवाज दाबला जात आहे आणि रस्त्यांवर शेतकरी, शेतमजूरांना लाठ्या काठ्यांनी मारलं जात आहे. जसं अशोक गेहलोत म्हणालेत की संसदेत संविधानाचा गळा घोटला जात आहे, तर शेतांमध्ये शेतकरी, शेतमजूरांच्या उदरनिर्वाहाचा,” अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली.