ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. एसपी त्यागी आणि त्यांच्या भावाला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑगस्टा वेस्टलॅण्डकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटींचे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात आले होते. या व्यवहारात दलाली देण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी यांच्यावर सीबीआयने कारवाई केली होती. या प्रकरणात त्यागी यांचे बंधू राजीव त्यागी व संजीव त्यागी, वकील गौतम खेतान, त्यांची पत्नी रितू खेतान, शिवानी सक्सेना, राजीव सक्सेना यांचा देखील समावेश होता.

या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) त्यागी व त्यांच्या दोन्ही भावांची चौकशी केली होती. जुलैमध्ये ईडीने या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला होता.
एसपी त्यागी व त्यांच्या बंधूनी जामिनासाठी अर्ज केला होता. पतियाला न्यायालयात बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यागी व त्यांच्या बंधूना जामीन मंजूर केला. तर न्यायालयात सुनावणीसाठी हजर न झालेल्या आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही.

काय आहे प्रकरण?
इटलीतील मिलानच्या भारतीय उच्च न्यायालयाशी समकक्ष असलेल्या न्यायालयाने फिनमेकॅनिका व ऑगस्टा वेस्टलँड या कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मध्यस्थांमार्फत कंत्राट मिळवण्यासाठी कशा प्रकारे दलाली याचा उल्लेख केला होता. त्या निकालात त्यागी यांचे नाव वारंवार घेण्यात आले होते. ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीस फायदा दिला जावा, यासाठी एस. पी. त्यागी यांना काही निधी दिल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यामुळे सीबीआयने त्यागी, त्यांचे १३ नातेवाईक आणि युरोपातील मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यागी यांनी हेलिकॉप्टर्सची विशिष्ट उंचीवरून उडण्याबाबतची अपेक्षा ६००० मीटर ऐवजी ४५०० मीटर केल्याने ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीला हे कंत्राट मिळू शकले, असा आरोप आहे. ईडीनेही या प्रकरणाची दखल घेत चौकशी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agusta westland case delhi patiala court grant bail to former air force chief sp tyagi
First published on: 12-09-2018 at 11:42 IST