ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणावरून काँग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरविले असतानाच खुद्द सोनियांनी आपल्यावरील सर्व आरोप बुधवारी फेटाळले. मी कोणतीही चूक केलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे सरकार सत्तेवर आहे. या प्रकरणात चौकशीही सुरू आहे. मग ते निष्पक्षपणे लवकरात लवकर चौकशी पूर्ण का करत नाहीत, असा प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणात राज्यसभेमध्ये भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेताच काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत जमून गोंधळ घातला. स्वामी यांनी आपले विधान मागे घेतले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी लावून धरली. सत्ताधारी आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक उडाल्याने कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रकरणावरून भाजपने सोनिया गांधी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांना संसदेत आणि संसदेबाहेर लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. उत्तराखंड प्रकरणावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष राज्यसभेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणत असल्याने ही रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे. या करारावरून मंगळवारी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला होता
ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीचे प्रमुख गिस्सेप ओरसी यांना इटालीच्या न्यायालयाने दोषी ठरविले. ओरसी यांनी ३६०० कोटी रुपयांचा हा करार मिळविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना लाच दिल्याचे मान्य केले, असे वृत्त आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी रणनीती ठरविली आहे. या करारासाठी मध्यस्थामार्फत १२० कोटी रुपयांची लाच दिल्याचे इटालीतील न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन सांगण्यात येत आहे.