ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात दलाली दिल्याच्या प्रकरणातील आरोपी असलेले माजी हवाई दल प्रमुख एस.पी.त्यागी यांचे मंगळवारी पुन्हा जाबजबाब घेण्यात आले. त्यागी हे सकाळी अकरा वाजता सीबीआय मुख्यालयात हजर झाले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी प्रकरणात त्यागी यांचा नेमका काय संबंध होता व त्यांच्या चुलतभावंडांची काय भूमिका होती याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
इटलीतील मिलान येथील अपील न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली देण्यात आल्याचे सांगून कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावली असून त्या निकालपत्राशी संबंधित कागदपत्रात त्यागी व त्यांच्या तेरा नातेवाईकांची नावे आहेत. एक युरोपीय दलालही यात सामील होता. त्यागी हे माजी हवाईदल प्रमुख असून त्यांनी हेलिकॉप्टर्स उडण्याची उंचीबाबत क्षमतेची मर्यादा ६००० मी. ऐवजी ४५०० मी. केली, त्यामुळे या व्यवहाराच्या लिलावात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला संधी मिळाली असा आरोप आहे. पण हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच झाला असे त्यागी यांचे म्हणणे आहे.