ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी करताना मोठय़ा प्रमाणावर लाच देण्यात आल्याच्या प्रकरणी आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि गुप्तचर विभागाचे माजी संचालक ईएसएल नरसिंहन यांची साक्षीदार म्हणून सीबीआय लवकरच जबानी नोंदविणार आहे.
नरसिंहन यांच्यासह माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि विशेष सुरक्षा पथकाचे तत्कालीन प्रमुख बी. व्ही. वांछू हे १ मार्च २००५ रोजी झालेल्या बैठकीला हजर होते आणि त्या बैठकीत ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनी पात्र  ठरेल, असा निर्णय घेण्यात आला होता.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या ३६०० कोटी रुपयांच्या करारात ३६० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, त्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने अलीकडेच नारायणन आणि वांछू यांची साक्षीदार म्हणून जबानी नोंदविली होती.
हेलिकॉप्टरबाबतच्या काही महत्त्वाच्या तांत्रिक मुद्दय़ांमध्ये मार्च २००५ च्या बैठकीत बदल करण्यात आले, त्या बैठकीला नारायणन आणि वांछू हजर होते. त्यामुळे त्यांची जबानी नोंदविणे गरजेचे होते, असे सूत्रांनी सांगितले. याच बैठकीला नरसिंहन हेही हजर असल्याने अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी त्यांची जबानी नोंदविणेही तितकेच गरजेचे आहे, असेही सूत्रांनी सांगितले.