भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाची सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावरून कामकाज रोखण्याची आणि यूपीए सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता असल्याने पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमच्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही आणि सर्व विषयांवर चर्चा करण्याची आमची तयार आहे. प्रत्येक विषयावर चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.
येत्या २१ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. पुढील आठवड्यात रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखू नये, यासाठी सत्ताधारी यूपीए प्रयत्नशील आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे सांगितले.