ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी लाच प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक जाहीर सभेत केलेल्या आरोपावरून सोमवारी संसदेत काँग्रेसच्या सदस्यांनी रणकंदन माजविले. नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली ती सरकारने फेटाळली.

काँग्रेसच्या सदस्यांनी सातत्याने घोषणाबाजी केल्याने पहिल्या दोन तासांतच राज्यसभेत याच प्रश्नावरून सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर वाया गेला. त्यानंतर नियोजित वेळेपूर्वीच कामकाज थांबवावे लागले. नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, फेकूमामांनी माफी मागावी, अशा घोषणा काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत दिल्या. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला विचारण्यात आलेला केवळ एकच प्रश्न वगळता सोमवारी राज्यसभेत अन्य कामकाज होऊ शकले नाही.

लोकसभेतही काँग्रेसच्या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. गेल्या आठवडय़ात याच विषयावर दोन्ही सभागृहांत झालेल्या चर्चेला उत्तर देताना संरक्षणमंत्र्यांनी सोनियांबाबत कोणताही उल्लेख केलेला नसताना मोदी यांनी असा आरोप कसा केला, असा सवाल काँग्रेसच्या सदस्यांनी केला. मोदी कोणत्या न्यायालयाचा संदर्भ देत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, अशी घोषणाबाजी काँग्रेस सदस्यांनी केली. मोदींच्या वक्तव्यामुळे सीबीआय आणि ईडीवर प्रभाव टाकला जाण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. कोणत्या न्यायालयाने सोनियांचा संबंध असल्याचे म्हटले आहे, ही गंभीर बाब असल्याने मोदींविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

डॉ. स्वामींनी सादर केलेल्या दस्तऐवजाला सभापतींची मंजुरी नाही

उपसभापती कुरियन यांचे स्पष्टीकरण

ऑगस्टा वेस्टलॅण्ड करारावरून सोमवारी भाजपचे सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. डॉ. स्वामी यांनी या प्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पुष्टय़र्थ सादर केलेल्या कोणत्याही दस्तऐवजाला राज्यसभेच्या सभापतींनी मंजुरी दिलेली नाही, असे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी जाहीर केले.

हेलिकॉप्टर खरेदी करारावरील चर्चेच्या वेळी डॉ. स्वामी यांनी जे आरोप केले आणि त्याबाबत त्यांनी जो दस्तऐवज सादर केला त्याला राज्यसभेने मंजुरी दिल्याचे डॉ. स्वामी यांनी ट्विटरवर जाहीर केले, असा मुद्दा काँग्रेसचे जयराम रमेश यांनी उपस्थित केला तेव्हा कुरियन यांनी वरील बाब स्पष्ट केली.

काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारसभेत सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस खासदार शांताराम नाईक यांनी मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याविरुद्ध हक्कभंग नोटीस राज्यसभेच्या सभापतींना दिली. यूपीए नेत्यांनी हेलिकॉप्टर घोटाळ्यात लाच घेतली, असा आरोप पंतप्रधानांनी केल्याचे सांगून नाईक यांनी ही नोटीस दिली आहे.