सुब्रमण्यम स्वामी यांनी ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी सभागृहापुढे सादर केलेली कोणतीही कागदपत्रे सभापतींकडून प्रमाणित करण्यात आली नसल्याची माहिती राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी सोमवारी दिली. गेल्या काही दिवसांपासून ऑगस्टा प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये रणकंदन सुरू आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेसवर आरोप करण्यात स्वामी आघाडीवर आहेत. मात्र, स्वामी ज्या फायलींच्या आधारे आरोप करत आहेत, तो दस्ताऐवज प्रमाणित केलेला आहे का, असा प्रश्न काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांकडून उपस्थित करण्यात आला होता.
सुब्रमण्यम स्वामी टीकेचे लक्ष्य 
यानंतर आपण उल्लेख करत असलेली माहिती राज्यसभेने प्रमाणित केल्याचे स्वामींनी ट्विटरवरून म्हटले होते. यासंदर्भात आज काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना पी.जे.कुरियन यांनी म्हटले की, राज्यसभेचे अध्यक्ष किंवा मी स्वत: स्वामी यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे प्रमाणित केलेली नाहीत. ज्यांनी ही कागदपत्रे प्रमाणित केली आहेत, त्यांच्यावर त्याची जबाबदारी आहे, असे कुरियन यांनी सांगितले.