ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळा

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी दाखल करण्यात आलेले पुरवणी आरोपपत्र थेट माध्यमांना मिळाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि या घोटाळ्यातील मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल यांनी शनिवारी दिल्ली न्यायालयात केली.

माध्यमांना आरोपपत्राची प्रत कशी मिळाली त्याचे स्पष्टीकरण मागणारी नोटीस वृत्तसंघटनेवर बजावण्याची मागणी ईडीने केली, तर ईडी या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप करून मिशेल यांनीही ईडीने न्यायालयात केलेल्या मागणीला पाठिंबा दिला. ही गंभीर बाब असल्याचा दावा ईडीचे विशेष सरकारी वकील डी. पी. सिंह आणि एन. के. मट्टा यांनी केला.

आरोपपत्राची प्रत अद्याप आरोपींनाच देण्यात आलेली नाही, असे असताना मिशेल यांच्या वकिलांना आम्ही त्यामध्ये काय लिहिले आहे त्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार त्यांनी याचिका दाखल केली. ही गंभीर बाब आहे, त्यामुळे प्रत कशी फुटली ते निश्चित करण्यासाठी या बाबत चौकशी झालीच पाहिजे, असे ईडीने म्हटले आहे.

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल याने केलेल्या याचिकेवरून दिल्ली न्यायालयाने शनिवारी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. आपल्याविरुद्धच्या आरोपपत्राची प्रत माध्यमांना देऊन ईडी या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप मिशेल याने याचिकेत केला आहे.

दुसरीकडे ईडीने आरोपपत्राची प्रत माध्यमांकडे कशी पोहोचली त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माध्यमांना ही प्रत कशी मिळाली त्याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी वृत्त संघटनांवर नोटीस बजावण्याची मागणी ईडीने केली आहे. आरोपपत्राची प्रत फुटल्याबाबतची सुनावणी ११ एप्रिल रोजी होणार आहे.

विशेष न्यायमूर्ती अरविंदकुमार यांनी ईडीवर नोटीस बजावली असून मिशेलच्या याचिकेवर म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान मिशेलने कोणाचेही नाव घेतले नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. माध्यमांद्वारे या प्रकरणी सनसनाटी निर्माण करण्यासाठी ईडीने आरोपपत्र फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.