अ‍ॅण्टनी यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा भाजपचा आरोप
ऑगस्टा वेस्टलॅण्ड या कंपनीला सवलत देण्यामागे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाच हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांनी ‘ऑगस्टा’ला देण्यात आलेल्या सवलतींवर तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व त्यात सोनिया गांधींचा हात होता, असा आरोप भाजपने केला आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीने आपल्या संकुलात हेलिकॉप्टरची चाचणी करावी, भारतात करू नये, अशी सवलत देण्याचे कारण काय, असा सवाल अ‍ॅण्टनी यांनी उपस्थित केला होता, असे पक्षाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी येथे सांगितले. भारताऐवजी परदेशात हेलिकॉप्टरची चाचणी घेण्याच्या प्रस्तावावर अ‍ॅण्टनी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कॅगच्या अहवालातही तेच म्हटले आहे. चाचणी भारतात घेण्यात आली नाही तर त्याची विश्वासार्हता काय, असा सवाल अ‍ॅण्टनी यांनी उपस्थित केला होता आणि याला परवानगी देता येणार नाही, असा शेरा फाइलवर मारला होता, असे नरसिंह राव यांनी निदर्शनास आणून दिले.
करारात विनंतीप्रस्तावाची अट घालण्यात यावी, अशी संरक्षणमंत्र्यांची इच्छा होती. अ‍ॅण्टनी यांच्या इच्छेकडे, हरकतीकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता सोनिया गांधी अथवा त्यांचे सल्लागार अहमद पटेल वगळता अन्य कोणत्या नेत्यामध्ये होती. केवळ एकच व्यक्ती अ‍ॅण्टनी यांना मौन पाळण्याचे आदेश देऊ शकत होती आणि ती म्हणजे सोनिया गांधी, असे नरसिंह राव म्हणाले.