29 September 2020

News Flash

ऑगस्ट वेस्टलँड घोटाळा: माजी हवाईदल प्रमुख त्यागींसह ९ जणांवर आरोपपत्र दाखल

९ डिसेंबर रोजी याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी (संग्रहित छायाचित्र)

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांच्यासह ९ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

त्यागी यांचे चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. माजी हवाईदलप्रमुख त्यागी यांना ९ डिसेंबर रोजी याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर २६ डिसेंबरला त्यांना जामीनही मिळाला होता. त्यागी आणि इतर आरोपींनी ऑगस्ट वेस्टलँडप्रकरणात लाच घेतल्याचा सीबीआयने आरोप केला आहे. हेलिकॉप्टर उत्पादकाला ५३ कोटी डॉलरचे कंत्राट मिळण्यासाठी या सर्वांनी मदत केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा
भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू १०१’ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली केला होता. हा करार ३,५४६ कोटी रुपयांचा होता. त्यातील ८ हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर ४ अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.

पूर्वीची रशियन एमआय-८ ही होलिकॉप्टर आता कालबाह्य़ ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. १९९९ साली प्रथम ही मागणी झाली. २००५ साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या. या पहिल्या निविदांमध्ये ६००० मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती. उंचीची (सव्‍‌र्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने २००६ साली शिथिल करून ४५०० मीटरवर आणली. त्यामुळे या स्पर्धेतील अमेरिकेच्या सिकोस्र्की कंपनीच्या ‘एस-९२ सुपरहॉक’ हेलिकॉप्टरची संधी हुकली असे म्हटले जाते. निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.

भारताने १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील ३ हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती. करार रद्द होईपर्यंत भारताने कंपनीला १६२० कोटी रुपये दिले होते आणि जानेवारी २०१४ मध्ये भारतीय बँकांमध्ये हमी म्हणून ठेवलेले २५० कोटी रुपये परत घेतले होते. इटलीत जून २०१४ मध्ये नुकसानभरपाईचा दावा जिंकल्यानंतर भारत सरकारने इटलीतील बँकांमध्ये ठेवलेली १८१८ कोटी रुपयांची हमीची रक्कम परत मिळवली. आजपर्यंत भारताने या व्यवहारातील एकूण २०६८ कोटी रुपये वसूल केले आहेत.

त्यागी यांच्या चुलत भावांना २००४ साली खात्री पटली की त्यागी त्यापुढचे हवाई दलप्रमुख होतील. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या मध्यस्थांबरोबर संधान बांधण्यास सुरुवात केली. सीबीआयच्या तपासात त्यागी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटल्याचे पुरावे सापडले आहेत. सीबीआयच्या आरोपांनुसार त्यागी यांना टय़ुनिशियात नोंदणी असलेल्या कंपन्यांकडून भारत आणि मॉरिशसमधील बँक खात्यांमधून पैसे पोहोचवण्यात आले. या कंपन्या स्वित्झर्लंडमधील मध्यस्थ ग्विडो हॅश्के आणि कालरे गेरोसा यांच्याकडून चालवल्या जात होत्या.

त्यागी यांना त्यांच्या संजीव, संदीप व राजीव या भावांमार्फत लाच मिळाली असा आरोप होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये ईडीने भारतात त्यांची मालमत्ता जप्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 7:40 pm

Web Title: agustawestland vvip chopper case cbi files chargesheet against ex iaf chief s p tyagi nine others
Next Stories
1 गोरखपूरनंतर आता राजस्थानमध्ये बालकांचा मृत्यू, ८१ दिवसांत ५१ जण दगावले
2 ‘राजीनाम्याचा प्रश्न ऐकलाच नाही, ऐकणारही नाही आणि त्यावर बोलणारही नाही’
3 रशियात ब्लू व्हेल गेमच्या अॅडमिन तरुणीला अटक
Just Now!
X